Friday, July 31, 2020

ओढ

जेव्हा मोकळ्या रस्त्याने 
तुझा हात हाती घेऊन 
चालत असते मी 
कितीतरी दिवास्वप्न रंगवत,
तेव्हा माझे पाय आपसूकच होतात
पिसासारखे हलके,
अन् तरंगत राहतात
हवेत अलगद..
तुझ्या हाताचा अलवार स्पर्श झेलत
चालत राहते मी अधांतरी 
जस काही चांदणंच उचलून 
नेतंय मला सुखाच्या दारी..
तू मात्र तुडवत असतोस पायांनी वाट समोरची
घाईच जणू तुला कुठेतरी पोहचण्याची..
भटकत असतोस जेव्हा असा आठवणींच्या गावात
कोणतातरी कातर क्षण चमकतो तुझ्या डोळ्यात..
हात माझा धरून पावलं टाकतोस खरी पुढे
पण पाहत असतोस सतत मागे
कसल्यातरी अनामिक ओढीने..
तेव्हा नसल्यासारखंच वाटत मला 
तुझ्या सोबतचं असणं माझं
काय पाहतोस वळून सारखं
कुणी सुटलंय का मागे तुझं ?

✍️निकिता सुनिल विचारे

No comments:

Post a Comment