स्त्री जन्मा.. ही तुझी कहाणी..!
"कधी
संपायची वाट
कधी लाभेल विसावा,
हे तुलाच ठावं रे
आकाशातल्या देवा"
अगदी असंच दुःख आपल्या समाजात
स्त्रिच्या पदरी असल्याचं नेहमीच जाणवतं. वेदोत्तर काळात स्त्रिची जी स्थिती पहावयास मिळते तिच स्थिती आजही भारताच्या काही भागात दिसून येते.
चूल आणि मूल, पडदापद्धती,
बालविवाह, सतीप्रथा, विधवा केशवपन, या अनिष्ट प्रथा त्या काळात सुरू
झाल्या त्याचे पडसाद आजही काही भागात दिसून
येतात. याची तीव्रता कमी झाली असली तरी ते पूर्णपणे संपुष्टात आलेले नाहीत. वैदिक काळात स्त्रियांचा दर्जा फार
समाधानकारक होता. त्यांना उच्च स्थान देण्यात आले
होते. गार्गी, मैत्रयी यांसारख्या विदूषी याच काळात
होऊन गेल्या. मिथिलेचा राजा जनक याच्या दरबारातील नवरत्नांपैकी गार्गी एक होती. मैत्रयी तर तिच्या
गुणविशेषांसह आठवणीत टिकून आहे. वाटणी नाकारुन आत्मज्ञान मागणारी मैत्रयी आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे
युगांचे उंबरठे ओलांडून आजही मनात घर करून राहिली आहे. वेदोत्तर कालखंडानंतर ते मध्ययुगीन काळापर्यंत
स्त्रियांच्या दर्जात घसरण होत
गेली ती भारतातील
काही भागात अजूनही
कायम आहे. आधुनिक
स्त्री अंतराळयानातून पार
अवकाश भ्रमण करुन
आली तरी तिचे
श्रेष्ठत्व मान्य करण्यास आमची पुरूषप्रधान संस्कृती अजूनही कचरतेच आहे.
१८८२ मध्ये
म्हणजे जवळजवळ १५०
वर्षांपूर्वी ताराबाई शिंदेनी 'स्त्री-पुरुष
तुलना' हा पहिला
स्त्रीवादी ग्रंथ
लिहिला. त्यानंतर इंदिरा
गांधी १९ जानेवारी १९६६ साली पहिल्या स्त्री पंतप्रधान झाल्या या घटनेला
आता पन्नासावे वर्ष चालू आहे. त्यानंतर २५ जुलै २००७ ला प्रतिभाताई
पाटील यांना पहिली स्त्री
राष्ट्रपती होण्याचा मान
मिळाला. आपल्या महाराष्ट्राला अजूनही स्त्री मुख्यमंत्री लाभली नाही हा भाग तर बाजूलाच राहू
देत. म्हणजे थोडक्यात १८८२ पासून महाराष्ट्राने आपल्याला अनेक स्त्रीवादी विचारवंत दिले. साहित्यातून स्त्रीवादी प्रवाह निर्माण केले. स्त्रिमुक्तीसाठी चळवळी
घडवून आणल्या. परंतु त्यांचे विचार, त्यांचा दृष्टिकोण अभिजात वर्गापासून ते बहुजन
वर्गापर्यंत पोहचला आहे का? तिचं होणारं आर्थिक, शारीरिक,
सामाजिक, धार्मिक शोषण
होतंच आहे. भटक्या
विमुक्त समाजातील स्त्रियांची आणि
दलित स्त्रियांची अवस्था
तर फारच दयनीय
आहे. मुस्लीम स्त्रियांवरील बंधनाबद्दल तर एक वेगळाच स्वतंत्र लेख तयार होईल.
स्त्री समोर
आज दत्त म्हणून
उभे असणारे जे अनेकविध प्रश्न
आहेत ते तिच्या
जन्मानंतरच उपस्थित होतात
असे नाही, तर जन्माला येण्यासाठी, मोकळा श्वास
घेण्यासाठी तिला धडपडावे लागत आहे. आपल्या
देशातील स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण पाहता हि गोष्ट सहज
लक्षात येईल. आपल्या
देशात मागच्या दशकात
सुमारे १२ लाख स्त्रीभ्रूण हत्येची प्रकरणे घडली
आहेत. देशातील लिंग-गुणोत्तर प्रमाण कमालीचे घटत
चालले आहे. दशकभरापूर्वी १००० मुलांमागे ९२७
मुली असे लिंग-गुणोत्तर होते. त्यात घसरण होऊन
१००० मुलांमागे ९१४ मुली
असे लिंग-गुणोत्तर प्रमाण
होते. यातील धक्कादायक गोष्ट अशी की या परंपरेचे वाहक निव्वळ अशिक्षित, मागास अथवा मध्यमवर्गीय समाजच आहे असे
नव्हे तर उच्च
व शिक्षित समाजही
या कृत्यात सक्रिय
आहे, यावेळी मला
मृत्यूंजयकार सावंत यांनी
आपल्या मृत्यूंजय कादंबरीत स्त्री सन्मानार्थ लिहिलेल्या ओळी आठवत आहेत. ते लिहितात की, "स्त्री म्हणजे
विश्वकर्त्याने आपल्या पहिल्याच साखर झोपेच्या वेळी
टाकलेल्या एक हळुवार
निःश्वास वाटतो मला !
त्या निःश्वासात पुरुषाच्या जळणाऱ्या मनाला शांत
करण्याची प्रचंड शक्ती
असते. स्त्रिच्या प्रेमळ
सहवासात माणूस जगाचे क्रौर्य
विसरु शकतो.
अपमानाचे कडू घोट
धीरानं पचवू शकतो. नव्या पराक्रमाचे पर्वत उभे करु
शकतो. "इतकी प्रचंड
शक्ती स्त्री सहवासात असूनही तिला जन्माला येण्याच्या मूलभूत अधिकारापासून दूर केले जाते.
तिच्या जीवनाची कळी
फुलण्याआधी खुरडली जातेय
आणि याचे कारण
काय तर ती निव्वळ स्त्री
आहे हा तिचा
दोष! वंशाचा कुलदीपक आपल्या कर्तुत्वाने, पराक्रमाने घराण्याचे नाव उज्वल करणारा
असा मुलगा आज प्रत्येकाला हवा
असतो. परंतु हा समाज हे विसरत चाललाय
की असे पराक्रमी, शुर पुरुष जन्माला घालणारी ही एक स्त्री
होती. इतिहास साक्षी
आहे, शिवाजी महाराजांना घडवण्यात, त्यांच्यावर स्वराज्याचे संस्कार करण्यास जिजाऊंचा सिंहाचा वाटा आहे.
त्यामुळे आपल्या घरी
शिवाजी जन्माला यावा
असे ज्यांना वाटते
त्यांनी आधी जिजाऊ
जन्माला येऊ द्या.
"स्त्री माता, पत्नी, भगिनी म्हणून
सर्वदा आहे प्रिय,
तरीही घेतला जातोय
तिचा गर्भातच जीव,
अशा समाजाविषयी राग
व्यक्त करावा
की करावी त्याची कीव
निव्वळ अहंकारापायी
पुरुष स्री सहवासास हुकतो आहे
फक्त शिवाजीच जन्माला
पाहिजे या हट्टापायी
वेडा जिजाऊला मुकतो आहे"
स्त्री म्हणजे वात्सल्याचा, वैश्विक तेजशक्तीचा, नवनिर्मितीचा अंश आहे. म्हणून 'आई' म्हणवून घेण्याचा अधिकार फक्त तिलाच
मिळाला आहे. असं
हे वात्सल्य जन्माला येण्याआधीच नाकारणा-या आपल्या
समाजाची मला कीव
कराविशी वाटते.
या सर्व
दिव्यातून पार पडून
जन्माला आल्यानंतरही तिच्या
नशिबातले भोग कमी
होत नाहीत, तर ते वाढतच जातात.
प्रत्येक स्त्री कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरी जातच आहे.
फरक इतकाच की प्रत्येकीच्या समस्येचे स्वरूप वेगळे आहे.
म्हणजे कुणाचे लैंगिक
शोषण होते तर कुणाचे आर्थिक ! कुणी मानसिक त्रास
सहन करतेय तर कुणी शारीरिक ! कुणी मूलभूत गरजांपासून वंचित आहे तर कुणी आजही
जातीयतेच्या गराड्यात भरडली
जातेय ! थोडक्यात काय,
तर स्वातंत्र्यानंतरही आमची स्त्री
काही स्वतंत्र नाही.
आज देशात बलात्काराचे प्रमाण पाहता क्रिकेटच्या रन प्रमाणे बलात्काराचा स्कोर वाढताना दिसत
आहे. मुंबईतील ४२ वर्षांपूर्वीचे 'अरुणा
शानबाग' बलात्कार प्रकरण, 'शक्ती मिल' बलात्कार प्रकरण
किंवा नवी दिल्लीतील 'निर्भया' सामूहिक बलात्कार प्रकरण या घटनांचे रेघोटे स्मरणातून पुरेसे
पुसले गेलेले नसतानाच मन सुन्न करणारं, माणुसकीला काळीमा फासणारं आणखी एक विदारक
सत्य समोर आले आहे
ते म्हणजे अल्पवयीन मुलींवरील बलात्कार! काही
दिवसांपूर्वी
"मटा'' मध्ये वाचलेल्या बातमी
वरून कळलं की सायन हॉस्पिटलमध्ये दर आठवड्याला किमान
चार अल्पवयीन बलात्कार पीडित मुली तपासणीसाठी व उपचारासाठी दाखल होत आहेत.
या मुली प्रामुख्याने ७
ते १९ वयोगटातील असतात. समाजाचे हे भयानक चित्र
हृदय विव्हल करणारं
आहे आणि यांतील
फक्त ५% स्त्रिया गुन्हा दाखल करताना
दिसतात. कारण आपल्या
समाजात बलात्कार पीडित स्त्रिला स्विकारले जात
नाही. तिला अपवित्र मानले जाते. पण वास्तवात अपवित्र ती स्त्री नाही
तर अशा संकुचित विचारसरणीचा आपला हा समाज अपवित्र आहे. कारण समोर
बलात्कार होत असताना
ते थांबवण्याचे धाडस
तो दाखवत नाही.
तेव्हा एकाचाही रक्ताला उखळी फुटत नाही.
त्वेषाने यांच्या मुठी
वळत नाहीत. तेव्हा
असाच विचार मनात
येतो की_
"आजही होतंय भर
सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण
स्त्रिची अब्रू
तुम्ही पटावर मांडलात,
पण आता कृष्ण कुठेच
दिसत नाही
पौरुष्य आणि सामर्थ्य काय तुम्ही वेशीवर
टांगलात ?"
जोपर्यंत आपल्या
समाजात स्त्री ही भोगवस्तू आहे
ही विचारसरणी नष्ट
होत नाही तोपर्यंत स्त्रिची पिळवणूक कमी
होणार नाही.
स्त्रिचे जसे लैंगिक शोषण होते तसेच तिचे आर्थिक शोषणही होताना दिसते. आजचे युग हे प्रसारमाध्यमांचे
युग आहे. जाहिरातींच्या झगमगत्या जगात स्त्रिचा वापर सर्रासपणे केला जातो आणि हा वापर एक वस्तू म्हणून होताना दिसतोय.
आज प्रत्येक जाहिरातीत स्त्री आहे,
मग ती जाहिरात शेविंग क्रिमची असो किंवा मग डीओड्रेन्टची. तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा असा वापर करून घेतला जातो आणि दुर्दैवाने ते तिच्याही लक्षात येत नाही. कवी शिरीष पै यांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर,
-
"फ्याशन शोज म्हणजे स्त्रिची गुलामीच,
पुरुषांच्या चंगळीसाठी स्वतःचा व्यापार"
थोडक्यात, स्वतःला सिद्ध
करण्याच्या धावपळीत ती स्वतःला विसरत
आहे. यातून तिची
स्वःताविषयक असणारी संवेदना, तिच्यातली निरागसता हरवत जाताना
दिसतेय. तिच्या आर्थिक
सबलीकरणाच्या नावाखाली तिचा
चाललेला हा व्यापार तिच्याविषयी वाटणाऱ्या दुःखाची जाणीव अधिकच तीव्र
करतो. जर एखादीच्या हे सारं काही
लक्षात आलंच तरी
प्रसिद्धी आणि संपत्तीच्या ओझ्याखाली दडपून, ती स्वतःला विसरून सोईस्कारीत्या याकडे
दुर्लक्ष करताना आढळते.
याचा मुळाशी जाऊन
विचार केला असता
जाणवते ते सत्य
असे आहे की,
"तळ्याकाठच
गवत तळ्याशी सलगीनंच वागत
कारण त्याला जगण्यासाठी तळ्यातलं पाणीच
लागत ''
या साऱ्या
विवंचनेतून आमची स्त्री
कायमची मुक्त व्हावी
असे वाटत असेल
तर सर्वप्रथम समाजाचा स्त्रिकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. स्त्री ही भोगवस्तू नसून
ती माता, भगिनी, पत्नी म्हणूनच नव्हे तर निव्वळ
स्त्री म्हणूनही सर्वदा
वंदनीय आहे ही विचारधारा जेव्हा
समाजात दृढ होईल तेव्हा
आमची स्त्री बंधनमुक्त होईल. खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. यासाठी तिला आर्थिकदृष्टया समृद्ध करणे, शैक्षणिकदृष्टया सबल
करणे गरजेचे आहे.
एकीकडे विद्येची देवता
म्हणून आम्ही सरस्वतीची आराधना करतो तर दुसरीकडे मुलींचे सर्वाधिक शाळा सोडण्याचे प्रमाण आमच्याच देशात
आहे. एकीकडे देवसेनेचे सेनापती स्विकरणारी दुर्गा
आम्हास वंदनीय आहे
तर दुसरीकडे आमच्या
देशात दररोज बलात्काराचे सुमारे ९२ गुन्हे
नोंदविले जातात; एकीकडे स्वसामार्थ्याने जगाचा दैनंदिन व्यवहार सुरु करणारी म्हणून
आम्ही 'उषा' देवतेचा लौकिक
गातो तर दुसरीकडे स्वतःचे निर्णय स्वतः
घेण्याइतकी मुभा आमच्या
मुलीना नाही. इतकचं
काय तर हल्लीचं एक उदाहरण सांगते, आमचे मराठीचे प्राध्यापक डॉ. सुनिल अवचार
सर यांनी आम्हांला त्यांनी पाहिलेले एक दृश्य
वर्गात वर्णन करून सांगितले ते असे होते
की, ते आपल्या
मुंबई युनिवर्सिटी फोर्टला (चर्चगेट) कामानिमित्त गेले
होते. तेव्हा तेथून
परत येताना त्यांनी असे पहिले की, युनिवर्सिटी समोर असणाऱ्या हायकोर्ट मधून एक लॉयर स्त्री
घाई गडबडीत बाहेर
निघून जात होती
आणि त्याच्या समोरच्या रस्त्यावर एका डोंबऱ्याचा खेळ चालू होता.
त्यामध्ये एक आई आपल्या छोट्या
बाळाला कडेवर घेऊन
ढोल वाजवत होती आणि
तिची सहा-सात वर्षाची मुलगी उंचावर बांधलेल्या दोरीवर आपला तोल
सावरत चालत होती.
सहज पाहिलं तर हे अत्यंत
साधारण चित्र आहे.
प्रत्येकाच्या जीवनशैलीवर भाष्य
करणार ! पण त्याच्या मुळाशी
जाऊन विचार केला
की जाणवणार चित्र
किती विसंगत आहे
ते पहा. एका
बाजूला आपला २३०
फूट उंचीचा प्रसिद्ध असा राजाबाई टॉवर.
म्हणजेच आपल्या देशातील ज्ञानव्यवस्थेचे प्रतीक तर त्याच्या समोर असणारा
हायकोर्ट आपल्या न्यायव्यवस्थेचे प्रतीक ! तिथून बाहेर पडणारी
ती स्त्री म्हणजे
आपल्या शिक्षणव्यवस्थेचे व न्यायव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारी उच्चशिक्षित स्त्री आणि तिच्या
समोर पोटाची खळगी
भरण्यासाठी आपल्या चिमुकलीचा जीव धोक्यात घालून
खेळ मांडणारी दुसरी आई म्हणजे
आपल्या समाजातील तळागाळातील स्त्रिचं प्रतिनिधित्व करणारी
सामान्य स्त्री ! दोन्हीही स्त्रियाच आहेत पण दोघींमध्ये
किती अंतर आहे. एक ज्ञान आणि न्याय यांनी समृद्ध असणारी व दुसरी आजही या दोन्हीं पासून वंचित आहे. या दोन्ही समाज घटकात ज्ञान आणि न्याय यांच्या सीमारेषेवरून
आपला तोल सावरत जाणारी ती चिमुकली आपल्या भारतच भविष्य
आहे. यावरून असं
दिसतं की, आपल्या देशात
एका ठराविक घटकातील स्त्रियांपर्यंतच
ज्ञानगंगा पोहोचली आहे आणि असे अजून
अनेक समाज घटक
आहेत त्यातील स्त्रिया ह्या ज्ञानापासून वंचित आहेत. हा
त्यांच्यावरील अन्यायच म्हणावं लागेल. जेव्हा ही विसंगती नष्ट होईल आणि प्रत्येक समाज घटकातील स्त्री ही ज्ञान
आणि न्याय या दोन्हीही परिपूर्ण असेल तेव्हा आमचा देश आमचा समाज प्रगल्भ, प्रगत होईल. त्यासाठी आता पासूनच शासनाने आणि आपण स्वतःही काही ठोस पाऊले उचलणे ही काळाची गरज आहे.
निकिता विचारे