Saturday, April 18, 2020

#तो

तो एकदा म्हणाला होता तिला, 
"तुला मला काही द्यायचेच असेल तर
तुझ्या ओठांवरचे स्मित दे...
तुझ्या डोळ्यांतली चमक दे... 
तुझी अपार स्वप्न दे...
तुझी प्रेमावरची श्रद्धा दे...
नात्यांवरचा विश्वास दे...
माझ्यासाठीचा तुझ्या मनाचा ध्यास दे..." 
आणि मग एक दिवस अचानक तो निघून गेला
मात्र जाता जाता तिचं सारं काही घेऊन गेला... 

✍️निकिता सु.विचारे 

Sunday, April 12, 2020

झुळूक

     आयुष्यात येणाऱ्या सानुल्या झुळुकेकडून फारशी आशा लावू नये.ती अशीच मधेच केव्हातरी येणार न् सुखावून जाणार. तिला थोपवून मुठीत ठेवण्याचा वेडा प्रयत्न केलात तर ती कधी हातून निसटून जाईल आणि ओंजळ रीती होईल याचा काही नेम नाही.
     हा पण तिचं स्वातंत्र्य न हिरावता तिच्या स्वच्छंदीपणाला दीर्घ श्वासात भरून हृदयात जपून ठेवू शकता. तेही "जगण्यासाठी तू हवीयस ग !" या विश्वासाने...
 
✍️ निकिता सु. विचारे 

Wednesday, April 8, 2020

ती

     ही कथा आहे तिची...
     जी धावतेय रक्ताळलेल्या पावलांनी सोनेरी स्वप्नामागे. पंख पसरून घेतेय उंचच उंच भरारी. व्यापून टाकतेय संबंध आसमंत. कवेत घेऊ पाहतेय आभाळ समस्त... पडते, थकते, माघारी येते.. विसावते फांदीवर.. घेते क्षणिक विश्रांती.. मग पुन्हा एकदा भरारी घेते, ओठांवर तेच स्मित खेळवत..
     पाहणाऱ्याला वाटत किती स्वतंत्र, स्वयंपूर्ण आहे ही…! प्रेरणांचा स्रोत, आदर्श प्रतिमा, ती म्हणजे आदर, तिचा केवढा तो आधार…! 
     पण ती ……
     ती लपवत असते एक गहिरे दुःख, आत आत खोल रुजलेलं. तिचा आसमंत भेदणारा तो आक्रोश लपवत असते ती  तिच्या गुलाबी ओठांमागे. तिची आतून तुटलेपणाची डगमगलेली जाणीव सावरू पाहत असते ती तिच्या आत्मविश्वासू चालीत… 
     इतरांसाठी जरी ती असली स्थितप्रज्ञ तरी स्वतःसाठी आहे ती सत्व हरवलेली प्रतिमा, जी शोधतेय वेड्यासारखी स्वतःची ओळख. दाही दिशा फिरत राहते शोधत स्वतःच अस्तित्व...
     जे चोरीला गेलंय.. "त्याच्याकडून"

✍️निकिता सु. विचारे