मला मीच केले उध्वस्त खुशीने
मग अंताचा दोष कुणा देऊ कशाला..
आजन्म सोबत केली या काट्याने
मग अधिकार फुलांचा मी घेऊ कशाला..
मीच ना दिला जरा थारा या जीवाला
मग रोष दुःखाचा मी साहू कशाला..
भिजले ना कधी मीच सरीत प्रीतीच्या
मग चटका मनाला तरी लावू कशाला..
रंग मोरपिसाचा ना मीच ओढला तनावर
मग रंगात कृष्णाला मी पाहू कशाला...
आजन्म राहिले मीच उभी उंबऱ्यावर
मग पैलतीरी आता तरी धावू कशाला...
मीच न झाले निळ्याची राधा कधीही
मग मिराची विराणी आता गाऊ कशाला...
कवटाळून बसले मीच विषाद आजवर
मग सुखात सरीच्या तरी नाहू कशाला..
निकीता सु. विचारे