Tuesday, April 5, 2016

कविता

पाचोळा..!

 
 
गळते होऊनी वृद्ध झाडाचे एकेक पर्ण ,
पायाखाली साचे जणू पिवळे सुवर्ण ...।।१।।
 
या सुवर्णाला मग कुणी केराने लोटती ,
तर कधी कुणी वाटसरू त्यास पायाने तुडविती...।।२।।
 
जेव्हा धमण्यांमधून वाही त्याच्या हिरवे रक्त ,
हर कुणी होत असे तेव्हा त्याच्या सावलीचा भक्त...।।३।।
 
आठवूनी हे गतकाळाचे वैभव मनी त्याच्या होत असे हूरहूर ,
पाचोळा सैरावैरा होऊनी मग करत असे कूरभूर...।।४।।
 
त्याचे अश्रू न दिसती कधी कोणास ना पहायलाही उंसत ,
ह्याच जाणीवेनेच त्यास होती वेदना अनंत...।।५।।
 
वृद्धापकाळ जवळ येताच चढली त्यावर सोनेरी छटा ,
तेव्हा त्याच्या झाडानेच दाखविल्या त्यास घराबाहेरच्या वाटा...।।६।।
 
दैवच फिरले त्याचे ना त्याला उभा कुणी वाली ,
निस्तेज पाचोळा हा नुसता पायाखाली पडून राही...।।७।।
 
अशावेळी बिचारा मग जागेवरच कुजून जाई ,
नाहीतर एखादी मंद झुळुक त्याला दूर उडवूनी नेई...।।८।।
                
निकिता सु. विचारे...