जागतिकीकरण आणि मराठी कविता
विशेष संदर्भ: सुनील अभिमान अवचार यांची कविता
जागतिकीकरण ही आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रवाहांना सामावून घेणारी अशी एक व्यापक संज्ञा आहे. ही एक अवस्था आहे. जागतिकीकरण म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सीमांचे विलोपन. या जागतिकीकरणाने आज आपल्याला घेरुन टाकले आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकात युरोपमध्ये झालेला आधुनिक भांडवली उत्पादन संबधांचा उगम, साम्राज्यवाद-वसाहतवाद ते विसाव्या शतकातील तंत्रवैज्ञानिक विकासातून झालेला अमेरिकन जीवनशैलीचा प्रसार करत आज आपण जागतिकीकरणाच्या प्रवाहात कळत-नकळतपणे मिसळून गेलो आहोत. जगभर श्रमिकांचे एक राष्ट्र, एक राज्य निर्माण होईल हे माक्र्सचे स्वप्न कुठेतरी भंग होऊन आज भांडवलदारांचे एक राष्ट्र, एक राज्य उभारण्याच्या दृष्टीने धडपड सुरु आहे.
जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेला सुरवात होऊन आज पंचवीसहून अधिक वर्षे उलटून गेली आहेत. सन १९९० च्या दशकानंतर जगात प्रचंड आर्थिक उलथापालथ झाली. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही झाला. जगातल्या अनेक राष्ट्रांप्रमाणे भारतानेही मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्विकारले. त्यातूनच ‘‘खा उ जा’’ (खाजगिकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) चे तत्व पुढे आले. या तत्वांच्या आधारे भारताने आपले नवे औद्योगिक धोरण तयार केले आणि खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेच्या बाजूने बोलणारे जसे आग्रही आहेत. तसेच त्याला कडाडून विरोध करणारेही आहेत. त्यामुळे ‘देश विकायला काढला आहे’, ‘आर्थिक गुलामगिरीचे युग सुरु झाले’ असे अनेक आरोप होऊ लागले. तरीही हे सारे विरोध पचवत जागतिकीकरणाची प्रक्रिया आपल्या देशात स्थिरस्थावर झाली आहे. जागतिकीकरणाचे अनेक बरे-वाईट परिणाम आपल्या जीवनक्षेत्रावर झाले आहेत. सामाजिक सांस्कृतिक बदल घडून आले आहेत. आपला समाज विविध प्रकारच्या विषमतेत विभागला आणि दुभंगला गेला आहे. जातीभेद, लिंगभेद, धर्मभेद, प्रादेशिकता यावर आधारीत विषमतेला जागतिकीकरणाने अधिकच खतपाणी घातले आहे. काही मूठभर सत्ताधारी, भांडवलदार वर्ग सोडले तर जागतिकीकरणाने आणलेली समृद्धी ही दिवसरात्र शेतात राबणाऱ्या बळीराजापर्यंत पोहचली नाही का आजही सगळया मूलभूत गरजांपासून वंचित असणाऱ्या आदिवासी पाडयात झिरपली नाही का विकासाच्या नावाखाली उध्वस्त झालेल्या प्रस्थापितांच्या झोपडयात गेली नाही. परिणामतः या प्रक्रियेत गरीब हा अधिकच गरीब होत गेला. उपासमारी, कंगालीच्या गारपिठीने झोडपला गेला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रियांचे आर्थिक शोषण, बालकामगार यांसारख्या असंख्य समस्या हे आपले विदारक वास्तव आहे. कुटुंबव्यवस्था जातीव्यवस्था, धार्मिक-सांस्कृतिक व्यवहार, माध्यमे या सर्वच ठिकाणी जागतिकीकरणामुळे पारंपरिक पगडा वाढत आहे.
भारतासारख्या देशात सांस्कृतिक विविधता हे महत्वाचे वैशिष्टय मानले जाते परंतु या जागतिकीकरणाच्या लाटेत आपल्या बहुमेळी, बहुपदरी, विभिन्नतेने नटलेल्या सांस्कृतिक आणि गतिमान जीवनाला एकरंगी अमेरिकन छाप संस्कृतीत बंदिस्त करु पाहत आहेत. ‘ग्लोबल’ विरुध्द ‘लोकल’ या संघर्षात आपल्या सांस्कृतिक, भाषिक जीवनाचा ऱ्हास होत आहे. परिणामतः ‘अस्मितेचे’ राजकारण पुढे येते. त्याचा परिणाम आपल्या समाजातील स्त्रियांना अधिक भोगावा लागतो. त्यातून त्यांचा समुहांतर्गत कोंडमारा वाढतो आणि अन्य स्त्रियांशी होत असलेल्या मैत्रीची शक्यताही कमी होते त्यामुळे एकसंघ अशी स्त्रीचळवळ निर्माण होण्यास हे वातावरण पोषक ठरत नाही. जागतिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या या समस्यांचा गरीब आणि शोषित वर्गाशी थेट संबध आहे. किंबहुना शोषितांचा, गरीबांचा, श्रमिकांचा, समाजाच्या तळाशी असणाऱ्या या वर्गालाच ही धग अधिक सोसावी लागतेय. जागतिकीकरणातल्या मानवी जीवनाच्या या विनाशाची चाहूल मराठी साहित्यात खूप कवींनी दिली आहे. यामध्ये अरुण काळे, वर्जेश सोलंकी, प्रज्ञा पवार, निरजा, सुनील अभिमान अवचार यांचा समावेश करता येतो. यापैकी समकालीन जगण्याचे अधोरेखन करणारे मराठीतील एक अत्यंत महत्वाचे कवी म्हणून सुनील अभिमान अवचार यांचा उल्लेख करता येतो.
सुनील अभिमान अवचार यांचा ‘केंद्र हरवत चाललेला वर्तुळाचा परिघ’ हा अलिकडेच प्रकाशित झालेला कवितासंग्रह आहे. कोल्हापूरच्या ‘निर्मिती संवाद’ या प्रकाशन संस्थेने त्यांच्या एकंदरीत तीनशे पन्नास कविता एकत्रित करुन ग्रंथरुपाने प्रकाशित केल्या आहेत. या सर्व कवितांमधून एक समान सूत्र आणि विचार प्रभावीपणे येतो. अंतःमुर्ख-विचारसन्मुख करणारी, सृष्टीसन्मुख-मानवसन्मुख करण्यासाठी धडपडणारी अशी ही कविता आहे. ग्लोबल युगाचे समग्र वास्तव दर्शन मांडणारी तीव्र कोमल, धारदार, रोखठोक तात्विक व व्यावहारिक तत्वांची चिकित्सा करणारी ही कविता आहे. दलित, पिडित व शोषितांविषयीची अथांग कणव व सहानुभूती, त्यांची वैश्विक पातळीवरील विविध संदर्भ आवाक्यात घेऊन मनाला भिडणारी, नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती, तसेच शोषितांच्या व स्त्रियांच्या व्यथा वेदनांना वैश्विक पातळीवर नेणारी व संपूर्ण शोषितांच्या सुखदुःखाशी समरस होणारी संवदेनशिलता, हे त्यांच्या काव्याचे वैशिष्टय आहे.
या देशातील सामान्य माणूस, शेतमजूर, स्त्रिया, दलित या तळागाळातील घटकांपासून ते थेट कॉर्पोरेट व भांडवली जगातील स्त्री-पुरुष, त्यांची जीवनशैली, त्यांच्या जीवनातील चढ-उतार या साऱ्याविषयीची संवेदना या कवितेतून व्यक्त होते. आजच्या ग्लोबल वर्तनाचा खरा चेहरा काय आहे याचे स्वरुप अवचार यांच्या कवितेतून दिसून येते. आजचा जीवन व्यवहार कसा आहे. कथन आणि करणी यामध्ये कोणता फरक आहे, गरीबी कोणत्या टोकाला जाऊन पोहचली आहे, श्रीमंतीची सूत्र कितपत चढली आहे, स्त्रियांची काय व्यथा आहे, सामान्यांची काय कथा आहे आणि या सर्व प्रक्रियेत प्रसारमाध्यमांची काय भूमिका आहे हे प्रश्न त्यांच्या कवितेतून उलगडत जातात. हा ग्लोबल वर्तमानाचा वरतून गोंडस वाटणारा चेहरा आतून किती दुखरा आणि करुप आहे, याचे भयाण वास्तव ते मांडताना ते लिहितात,
‘‘ह्या ग्लोबल वर्तमानात
भावना झाली आहे जाहिरात आणि
मेंदूचे झाले आहे कॉम्पुटर
तत्वज्ञान झाले आहे Use & Throw
संस्कृती झाली आहे रखेल’’
या ओळीत आजचा अस्वस्थ वर्तमान समोर येतो.
संस्कृतीचे झालेले विकृतीकरण, बाजारीकरण याचे चित्रण करताना ते सामान्य, गरीब माणसाचे भयाण वास्तवही मांडतात. तेव्हा त्यांच्या लेखणीतून पुढील ओळी अवतरतात...,
‘‘कामगार स्वतःचे अवयव विकत आहे स्वस्तात
जगाचा पोशिंदा करु लागला आहे आत्महत्या
सर्वदूर होत आहे स्त्रीभ्रूण हत्या
आणि श्वास बुरख्यात गुदमरतो आहे’’
श्रीमंताना अधिक श्रीमंत करणारी आणि गरीबांना अधिक गरीब करणारी अशी ही एकूण आर्थिक स्थिती आहे. विजय माल्या, निरव मोदी बकँची कर्जे बुडवून, करोडोंचे घोटाळे करुन दुसऱ्या देशात सुरक्षित पळून जातात आणि साध्याशा कर्जासाठी आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो. दिडशे-दोनशे किलोमीटर चालूनही भूमीहीन शेतमजूरांच्या वाटयाला न्याय येत नाही. असा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाची संख्या वाढतच आहे. मोजक्याच लोकांच्या पायावर भौतिक सुखे लोटांगण घालत आहेत. अवचार यांच्या ‘कॉमन मॅन’ या कवितेतून याचाच प्रत्यय येतो. ते म्हणतात,
‘‘कॉमन मॅन असतो
इतिहासाच्या ई-बुकात
अंतराळाच्या अंधुक दुनियेत,
तिसऱ्या जगाच्या पृष्ठावर,
वर्तमानाच्या सर्च इंजिनावर,
B.B.C. च्या वार्तापत्रात सगळीकडे...
पण, तो नसतोच कधी
राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यात !’’
हा कॉमन मॅन अवचारांच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. याबद्दल डॉ. अशोक नामदेव पळवेकर म्हणतात, हा ‘कॉमन मॅन’ सगळीकडे आहे. म्हणून आपण ‘ Global Village Culture’ चा विचार करताना सर्वसामान्य माणसाच्या बाजूने विचार करणारे असू तर एक वैश्विक मन (Universal Mind) आपल्या व्यक्तित्वात सतत बाळगून आपण मानव्यविरोधी संघर्षात आपली भागिदारी नोंदवली पाहिजे, असा भावविचार सुनील अभिमान अवचारच्या ‘केंद्र्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परिघ’ काव्यसंग्रहातून कमालीच्या दाहकतेने अभिव्यक्त झाला आहे. (केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परिघ, पृष्ठ १३)
महानगरांच्या मीडियाच्या केंद्रस्थानी हा कॉमन मॅन कधीच नसतो. तेथे त्याच्या मुलभूत प्रश्नांना डिलीट बॉक्समध्ये हाताने फेकले जाते. हा मीडिया धन्नाडयांच्या हातातील कटपुतळी झालेला आहे. एक भाकड कथा जे वास्तवच नाही, असे अतिवास्तव, काल्पनिक जग या मीडियाने उभे केले आहे. हिंसा आणि लैंगिकता यांचे उदात्तिकरण करुन सर्वसामान्यांना एका गुंगीमध्ये ठेवत आहे अशा वेळी या व्यवस्थेला समजून घेण्याचा प्रयत्न अवचार ‘मीडिया’ या कवितेतून करतात. या नव्या मीडियाने माध्यमांतून सामान्यांचे प्रश्न, सामान्यांची दुखणी कशी बाद केली आहेत याची तीव्र जाणीव व्यक्त करताना ते लिहितात,
‘‘मीडियाची हेडलाईन सेक्सला चीअर्स करते
पॉलिटिक्सवर डाऊनलोड होते
मीडिया वाटतो व्हायरसचा अंधार
उद्ध्वस्त कंधार
मीडिया इराकची युद्धभूमी
संयुक्त राष्ट्रसंघाची ममी
जखमांचे रेडक्रॉस
इंटरपोलची आस
मीडीया डोकावतो व्हाईट हाऊसमध्ये
एसीचे प्रश्न: पेज थ्री मध्ये
श्रमाची धग मात्र
हलक्या हाताने फेकली जाते
डिलीट बॉक्समध्ये !’’
सुनील अभिमान अवचार यांची कविता भारतातील प्रस्थापित व्यवस्थेविरुध्द विद्रोही भूमिका घेत नाही तर जगातील समस्त शोषक वर्गाच्या विरुध्द ती आवाज उठवते. या जागतिकीकरणात सर्वात वाईट अवस्था दलित व स्त्री यांची झाली आहे. त्यामुळे त्यांच्या अनेक कवितांमधुन स्त्रिविषयक संवेदना व्यक्त होतात. ‘मातृसत्तेच्या कविता’, ‘माझे शब्द आईच्या दूधातून’, ‘बिंबो’, ‘फूलन आणि मूलाहीजा भारतीय स्त्रीया’, ‘माझी आजी’, ‘आमच्या आणि त्यांच्या स्त्रियांचे राजकारण’, ‘खैरलांजी: प्रियांका भोतमांगे या कवितांच्या माध्यमातून आजच्या स्त्रियांचे प्रश्न, तिच्या अस्मितेचे प्रश्न, पितृसत्ता या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे.
त्यांच्या ‘ती मला भेटली’ या दीर्घ कवितेतून त्यांनी जगातील सर्व स्त्रियांच्या निरनिराळया स्वरुपाचे त्यांच्या विविधावस्थेचे यथार्थवादी दर्शन घडवले आहे ते म्हणतात,
‘‘ती मला भेटली....
राजकुमारांच्या गोड गुलाबी स्वप्नांतल्या भुलभुलैया बनात....
गंजलेल्या सर्वच गंभीर धर्मग्रंथाच्या पानात....
ती मला येथे भेटते
ती मला तेथे भेटते
क्षणासाठी भेटते, हजारो वर्षांपासुन भेटते.’’
कवी सुरुवातीलाच या ग्लोबल वर्तमानात दिसणारी स्त्रीची दोन विविध रुपे आपल्यासमोर सादर करतो. एक आपल्या राजकुमाराविषयीची स्वप्न पाहणारी, मोकळी मुक्त, आत्मभान आलेली आहे तर दुसरी गंजलेल्या धर्मग्रंथात बंदिस्त असणारी, परंपरेच्या विळख्यात जखडलेली! त्यांनी बदलत्या काळाच्या संदर्भात मांडलेली स्त्रीची व्यथा व वेदना ही चिंतनशील आहे, पुढे ते लिहितात, कधी ती पुरुषांच्या जाहिरातीचे मादक पोस्टर न्याहाळते तर कधी लोकल ट्रेनमध्ये पुरुषांच्या नराधमी नजरेस खडे बोल सुनावत, डोळे वटारुन शिवी हासडते. डोंबाऱ्याच्या खेळात तोल सावरणारी, हॉस्पिटलमध्ये जखमांवर फुंकर मारणारी, माळरानात कापुस वेचणारी, साक्षेरतेच्या शाळेत कंदिलाच्या अंधुक प्रकाशात मुळाक्षरे गिरविणारी, तर कधी पुरुषप्रधान संस्कृतीत जातीव्यवस्थेच्या जात्यात भरडणारी ही स्त्री बुरखा पांघरुन सेकेंड हॅण्डचा ठप्पा घेत स्त्रीच्या दुःखाची भयावह कथा सांगते.
आधुनिक स्त्रीच्या विविध रुपांवर भाळलेल्या या कवीच्या कवितेतील स्त्री जाणीवेचे वैशिष्टय म्हणजे, ग्लोबल वर्तमानातील पंचतारांकीत खोल्यांमध्ये महागडया सिगरेटचे झुरके घेत, लब्धप्रतिष्ठित मद्याचे घोट घेत आरामात पहुडलेली, गप्पांमध्ये सैल झालेली स्त्रीही त्यामध्ये आहे. स्वतःसाठी अंर्तवस्त्र पारखून घेणारी स्त्री, हायकोर्टात जस्टीसपुढे ऑर्ग्यूमेंट करत उभी असणारी, आपल्या हक्कासाठी लढणारी, संसदेत प्रश्न मांडणारी, प्रसंगी लाठीचार्ज झेलत, खांद्यावर झेंडा घेऊन स्त्रियांच्या सामाजिक आंदोलनात सहभागी होणारी स्त्री अशा नानाविध भुमिकांमधील, जीवनाच्या विविध अवस्थांमधील ग्लोबल वर्तमानातील स्त्री जाणीव अवचार यांच्या कवितेत आढळते.
कवी स्त्रियांचा कॉर्लिडोमद्धे होणारा वापर पाहून विदीर्ण होतो. स्त्री अत्याराचाराच्या सेन्सेटिव्ह न्यूज वाचून दहशतीने थरारणारी वयात येणाऱ्या तरुणींची पिढी व त्यांचे थरारणे ही चित्रीत करतो. अवचार यांच्या कवितेतील स्त्री सर्वत्र आहे. तिने एकेकाळी कृष्णालादेखील भूरळ घातली आहे. गालीब तिच्यावर फिदा होता, बाजिरावाचा कर्मठपणा देखिल तिला बंदिस्त करु शकला नाही अशा ह्या स्त्रीच्या विविध रुपांचा कवी वेध घेतो व शेवटी ती नाही तर या विश्वात काहीच नाही, ‘‘ती म्हणजे खूप काही, ती काही हातात लागत नाही....’’ अशी ग्वाहीही देतो.
जागतिकीकरणाच्या निमित्ताने सर्वत्र व्यापारी संस्कृती आली आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूचे बाजारीकरण झाले आहे. भांडवली जगात प्रत्येक वस्तूची किंमत असते तशीच व्यक्तिच्या गुणवत्तेप्रमाणे त्याचीही किंमत ठरते. अशा सगळया वातावरणात स्त्रीचा वापरही एक वस्तू म्हणून होताना दिसतो. तिच्या शारीरिक सौंदर्याला आणि देहाला अधिक महत्व प्राप्त होताना दिसते. म्हणून फॅशन शो, सौंदर्यास्पर्धा यांसारख्या गोष्टींना अवास्तव महत्व आले आहे. त्यामुळे स्त्रीच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा सर्रास वापर करुन घेतला जातो आणि हे सारे खुलेआम सुरु आहे. ह्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्त्रीयांनाही फारस संकोच वाटत नाही. कामाप्रमाणे मोबदला इतकाच दृष्टिकोन दिसतो. त्यामुळे आत्मसन्मान, स्त्रीत्वाची प्रतिष्ठा यांसारख्या शब्दांना आता फारसे महत्व ठरत नाही. हीच व्यथा मांडताना आपल्या, ‘आगतिकीकरणाचे ऑलम्पिक २००८’ या कवितेत अवचार म्हणतात,
‘‘सुंदर मुली सर्वांच्याच प्रपोजचा का करत आहेत विचार
मॉडलिंग कोर्सेसचा सुटला आहे सुळसुळाट.’’
जागतिकीकरणाच्या या चंगळवादी जीवनात स्त्री उपभोगासाठी हवी आहे. स्त्री म्हणजे पत्नी, बहिण, मुलगी अशी स्वच्छ प्रतिमा बाजूला सारुन या बाजारीकरणाच्या प्रक्रियेत तिच्या देहाचे वस्तुरुप करण्यात आले आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यावर भर देऊन पुरुषांच्या लैंगिक गरजापूर्ततेसाठी त्यांना तयार करण्यावर भर दिला जातो. ह्याचे चित्रण कवी करतो आणि ‘‘तरण्यामुली लावतात How to Strip चा क्लास’’ यातून तिच्या जगण्याची होणारी, मोडतोड पाहून सुन्न होतो. या भांडवलदारी समाजाने स्त्रीचे मातृत्व सुध्दा विक्रिस काढले आहे. या व्यापार संस्कृतीच्या या मस्तवाल वागण्याने आगतिक होऊन कवी लिहितो,
‘‘मोलकरणीमधील आईला पाळी आली आहे
गर्भ भाडयाने देण्याची
लेदर करंसीचे मार्केट झाले आहे आंतरराष्ट्रिय...’’
स्त्रीजीवनाची तात्विक आणि भावनिक बैठक मोडू पाहणाऱ्या जागतिकीकरणाला जेव्हा पोषक वातावरण तयार होते तेव्हा कवी प्रचंड अस्वस्थ होतो. कवीची हीच अस्वस्थता त्यांच्या ‘ब्रॅण्ड अॅम्बेसिडर’ या कवितेत दिसून येते. माणसाचा माणूस म्हणून स्विकारणारी विचारधारा व त्याचे वस्तूत रुपांतर करणारी भांडवलशाही व्यवस्था या दोन परस्पर भिन्न टोकांमधील हा संघर्ष आहे. यातून सुनील अभिमान अवचार यांच्या कवितेतील संवेदना आकार घेते.
हिंदी, इंग्रजी, मराठी शब्दांचा वापर केल्याने ह्या कवितेची भाषा ही ग्लोबल वर्तमानातील कालसंहितेची भाषा ठरते. सर्वसामान्यांची नागरी बोली, ग्राम्यबोली, म्हणी, वाक्यप्रचार, गीत जाहिरातीमधील टॅगलाइन यांचा वापर केल्याने काव्याविष्कार व त्यातून व्यक्त होणारी भावना यांच्या वाचक अधिक जवळ जातो. या विविध छटांमुळे ही कविता अधिक परिणामकारक ठरते.
स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत या द्वैतापलिकडे जात समकालीन समाजाचे पडसाद त्यांच्या काव्यातून जाणवतात. ‘ग्लोबल’ स्त्रीसंवेदनांचा पुरस्कार करणारी, समाजवास्तवाचे भान जोपासणारी अशी ही कविता आहे. ‘ग्लोबल विरुध्द लोकल’ या संघर्षात लोकलच्या बाजूने लढा देत सर्वसामान्य माणसाची वेदना सर्वार्थाने अंकित करणारी त्यांची ही भूमिका उल्लेखनीय आहे. डॉ. अशोक इंगळे, यांच्या मते, ‘‘चिंतनशीलता, विचारप्रवर्तकता आणि वैश्विक जाणीवेची स्पष्ट भूमिका घेऊन लिहिणारे उत्तम कवी फार थोडे आहेत. सुनील अभिमान अवचार यांची कविता या पठडीची आहे. म्हणून ती दखलपात्र कविता ठरते. तर डॉ. किसन पाटिल यांच्या मते, ‘‘कवीची ही कविता सध्या विहंगमावलोकनासारखी वाटत असली तरी ती, तशीच प्रगल्भ, परिपक्व होत जाईल तशी ती समाजाचे आंतरिक सूक्ष्म ताणेबाणे अधिक हळूवारपणे मांडू शकेल अशी आशा वाटते.’’ डॉ. अशोक नामदेव पळवेकर यांच्या मते, ‘‘आजच्या एकूणच मराठी कवितेत ही कविता नव्वदोत्तर कालखंडातील पावशतकाची कालसंहिता मांडणारी एक प्रगल्भ अभिव्यक्ती ठरते !’’
अशा प्रकारे अनेक समीक्षकांनी देखील या काव्यसंग्रहाची दखल घेत या कवितांवर सौंदर्याची लेणी चढवली आहे.
- निकिता सुनिल विचारे