Friday, July 31, 2020

ओढ

जेव्हा मोकळ्या रस्त्याने 
तुझा हात हाती घेऊन 
चालत असते मी 
कितीतरी दिवास्वप्न रंगवत,
तेव्हा माझे पाय आपसूकच होतात
पिसासारखे हलके,
अन् तरंगत राहतात
हवेत अलगद..
तुझ्या हाताचा अलवार स्पर्श झेलत
चालत राहते मी अधांतरी 
जस काही चांदणंच उचलून 
नेतंय मला सुखाच्या दारी..
तू मात्र तुडवत असतोस पायांनी वाट समोरची
घाईच जणू तुला कुठेतरी पोहचण्याची..
भटकत असतोस जेव्हा असा आठवणींच्या गावात
कोणतातरी कातर क्षण चमकतो तुझ्या डोळ्यात..
हात माझा धरून पावलं टाकतोस खरी पुढे
पण पाहत असतोस सतत मागे
कसल्यातरी अनामिक ओढीने..
तेव्हा नसल्यासारखंच वाटत मला 
तुझ्या सोबतचं असणं माझं
काय पाहतोस वळून सारखं
कुणी सुटलंय का मागे तुझं ?

✍️निकिता सुनिल विचारे

Thursday, July 30, 2020

एक छोटीशी गोष्ट...

होती एक छोटीशी गोष्ट तुझ्यामाझ्या मधली
गैरसमजाने आपल्या तिची कादंबरी झाली...
वाचावी म्हटलं तरी वाचता नाही आली
बघता बघता तिला रद्दीची किंमत दिली..

होती एक छोटीशी गोष्ट तुझ्यामाझ्या मधली
शब्द शब्द गुंफत एका धाग्यात गुंतत गेली...
दोन टोक हाती घेऊन ओढत राहिलो मग तिला
बघता बघता चढाओढीत प्रीती विरून गेली...

होती एक छोटीशी गोष्ट तुझ्यामाझ्या मधली
टोचत राहिली आतल्या आत सुईच्या टोकासारखी...
पडत गेले घाव काळजावर नाती जखमी झाली
बघता बघता तोडला दम त्यांची शोकांतिका झाली..

बस ही एक छोटीशी गोष्ट होती तुझ्या माझ्या मधली..


✍️निकीता सु. विचारे

Sunday, July 19, 2020

प्राक्तन

आवेगाच्या अशांत रात्री
गात्रात जागृती
पण बधीर साऱ्या संवेदना,
पदरात खेळती स्मृतींचे काजवे
अन नजरेत शून्य भावना..
करपाश कर्तव्याचा भासे विखारी
तरी ही प्रथा येथे आहे जुनी ,
समर्पित मी निखाऱ्यास होते
आज्ञा रवीची ती मानूनी.. 
मी घेऊन मुखी कापूस
स्पर्श खुशाल हा झेलते,
मी सोसत घाव काळजातला
या प्राक्तनावर रेलते..

✍️निकिता सुनिल विचारे