Friday, October 30, 2020

प्रश्न

     कधीतरी असं होतं की आपण निराशेच्या गर्ततेत खोल खोल बुडत असताना कुणीतरी अचानक येऊन आपला हात धरतं आणि बाहेर खेचतं अगदी ध्यानी मनी नसतानाही. त्याचं असं अलवार जखमेवर फुंकर घालणं किती सुखावून जातं मनाला ! त्याची आश्वस्थ नजर सतत धीर देते की मी आहे तुझ्यासोबत, अगदी कायम ! मुठीत चांदणं लपवावं तसं त्याचं ते स्मित डोळ्यात दडवून आपणही मग बागडत राहतो बेभान होऊन हरणीसारखं माळभर अन् अचानक ठेच लागते.
     आपण भानावर येतो तेव्हा कळतं अरे सावरणारा हाही हात काळाच्या चक्रात कधीचाच मागे राहिला ! आपण कोणत्या अनामिक धुंदीत एकटंच पूढे आलो इतकं ? मागे वळून पहावं तर आठवणीशिवाय कोणत्याच पाऊलखुणा त्याच्या असण्याची साक्ष देत नाहीत. मग पुन्हा एकदा तोच जुना काळाभोर विषाद पसरू लागतो माळभर. आता हा अंधार कोंडावा आत खोलवर नि लावून घ्यावं मनाच दार कायमचं की प्रतीक्षा करावी पुन्हा एखाद्या अशा हाताची जो सुटणार नाही मधेच कधीही ?

✍️निकिता सु. विचारे

Sunday, August 16, 2020

माझी मीच...

मला मीच केले उध्वस्त खुशीने
मग अंताचा दोष कुणा देऊ कशाला.. 

आजन्म सोबत केली या काट्याने
मग अधिकार फुलांचा मी घेऊ कशाला.. 

मीच ना दिला जरा थारा या जीवाला
मग रोष दुःखाचा मी साहू कशाला..

भिजले ना कधी मीच सरीत प्रीतीच्या
मग चटका मनाला तरी लावू कशाला..

रंग मोरपिसाचा ना मीच ओढला तनावर
मग रंगात कृष्णाला मी पाहू कशाला... 

आजन्म राहिले मीच उभी उंबऱ्यावर
मग पैलतीरी आता तरी धावू कशाला... 
 
मीच न झाले निळ्याची राधा कधीही
मग मिराची विराणी आता गाऊ कशाला...

कवटाळून बसले मीच विषाद आजवर
मग सुखात सरीच्या तरी नाहू कशाला..

निकीता सु. विचारे

Friday, July 31, 2020

ओढ

जेव्हा मोकळ्या रस्त्याने 
तुझा हात हाती घेऊन 
चालत असते मी 
कितीतरी दिवास्वप्न रंगवत,
तेव्हा माझे पाय आपसूकच होतात
पिसासारखे हलके,
अन् तरंगत राहतात
हवेत अलगद..
तुझ्या हाताचा अलवार स्पर्श झेलत
चालत राहते मी अधांतरी 
जस काही चांदणंच उचलून 
नेतंय मला सुखाच्या दारी..
तू मात्र तुडवत असतोस पायांनी वाट समोरची
घाईच जणू तुला कुठेतरी पोहचण्याची..
भटकत असतोस जेव्हा असा आठवणींच्या गावात
कोणतातरी कातर क्षण चमकतो तुझ्या डोळ्यात..
हात माझा धरून पावलं टाकतोस खरी पुढे
पण पाहत असतोस सतत मागे
कसल्यातरी अनामिक ओढीने..
तेव्हा नसल्यासारखंच वाटत मला 
तुझ्या सोबतचं असणं माझं
काय पाहतोस वळून सारखं
कुणी सुटलंय का मागे तुझं ?

✍️निकिता सुनिल विचारे

Thursday, July 30, 2020

एक छोटीशी गोष्ट...

होती एक छोटीशी गोष्ट तुझ्यामाझ्या मधली
गैरसमजाने आपल्या तिची कादंबरी झाली...
वाचावी म्हटलं तरी वाचता नाही आली
बघता बघता तिला रद्दीची किंमत दिली..

होती एक छोटीशी गोष्ट तुझ्यामाझ्या मधली
शब्द शब्द गुंफत एका धाग्यात गुंतत गेली...
दोन टोक हाती घेऊन ओढत राहिलो मग तिला
बघता बघता चढाओढीत प्रीती विरून गेली...

होती एक छोटीशी गोष्ट तुझ्यामाझ्या मधली
टोचत राहिली आतल्या आत सुईच्या टोकासारखी...
पडत गेले घाव काळजावर नाती जखमी झाली
बघता बघता तोडला दम त्यांची शोकांतिका झाली..

बस ही एक छोटीशी गोष्ट होती तुझ्या माझ्या मधली..


✍️निकीता सु. विचारे

Sunday, July 19, 2020

प्राक्तन

आवेगाच्या अशांत रात्री
गात्रात जागृती
पण बधीर साऱ्या संवेदना,
पदरात खेळती स्मृतींचे काजवे
अन नजरेत शून्य भावना..
करपाश कर्तव्याचा भासे विखारी
तरी ही प्रथा येथे आहे जुनी ,
समर्पित मी निखाऱ्यास होते
आज्ञा रवीची ती मानूनी.. 
मी घेऊन मुखी कापूस
स्पर्श खुशाल हा झेलते,
मी सोसत घाव काळजातला
या प्राक्तनावर रेलते..

✍️निकिता सुनिल विचारे

Saturday, April 18, 2020

#तो

तो एकदा म्हणाला होता तिला, 
"तुला मला काही द्यायचेच असेल तर
तुझ्या ओठांवरचे स्मित दे...
तुझ्या डोळ्यांतली चमक दे... 
तुझी अपार स्वप्न दे...
तुझी प्रेमावरची श्रद्धा दे...
नात्यांवरचा विश्वास दे...
माझ्यासाठीचा तुझ्या मनाचा ध्यास दे..." 
आणि मग एक दिवस अचानक तो निघून गेला
मात्र जाता जाता तिचं सारं काही घेऊन गेला... 

✍️निकिता सु.विचारे 

Sunday, April 12, 2020

झुळूक

     आयुष्यात येणाऱ्या सानुल्या झुळुकेकडून फारशी आशा लावू नये.ती अशीच मधेच केव्हातरी येणार न् सुखावून जाणार. तिला थोपवून मुठीत ठेवण्याचा वेडा प्रयत्न केलात तर ती कधी हातून निसटून जाईल आणि ओंजळ रीती होईल याचा काही नेम नाही.
     हा पण तिचं स्वातंत्र्य न हिरावता तिच्या स्वच्छंदीपणाला दीर्घ श्वासात भरून हृदयात जपून ठेवू शकता. तेही "जगण्यासाठी तू हवीयस ग !" या विश्वासाने...
 
✍️ निकिता सु. विचारे 

Wednesday, April 8, 2020

ती

     ही कथा आहे तिची...
     जी धावतेय रक्ताळलेल्या पावलांनी सोनेरी स्वप्नामागे. पंख पसरून घेतेय उंचच उंच भरारी. व्यापून टाकतेय संबंध आसमंत. कवेत घेऊ पाहतेय आभाळ समस्त... पडते, थकते, माघारी येते.. विसावते फांदीवर.. घेते क्षणिक विश्रांती.. मग पुन्हा एकदा भरारी घेते, ओठांवर तेच स्मित खेळवत..
     पाहणाऱ्याला वाटत किती स्वतंत्र, स्वयंपूर्ण आहे ही…! प्रेरणांचा स्रोत, आदर्श प्रतिमा, ती म्हणजे आदर, तिचा केवढा तो आधार…! 
     पण ती ……
     ती लपवत असते एक गहिरे दुःख, आत आत खोल रुजलेलं. तिचा आसमंत भेदणारा तो आक्रोश लपवत असते ती  तिच्या गुलाबी ओठांमागे. तिची आतून तुटलेपणाची डगमगलेली जाणीव सावरू पाहत असते ती तिच्या आत्मविश्वासू चालीत… 
     इतरांसाठी जरी ती असली स्थितप्रज्ञ तरी स्वतःसाठी आहे ती सत्व हरवलेली प्रतिमा, जी शोधतेय वेड्यासारखी स्वतःची ओळख. दाही दिशा फिरत राहते शोधत स्वतःच अस्तित्व...
     जे चोरीला गेलंय.. "त्याच्याकडून"

✍️निकिता सु. विचारे

Saturday, February 22, 2020

समुद्र

     आयुष्याच्या एका रम्य सायंकाळी मी शांत, मुग्ध मनाने समुद्रकिनारी बसले होते. क्षितिजभर पसरलेला रत्नाकर... लाटांचा रंगात आलेला पाठशिवणीचा खेळ... कुठे दूरवर स्वच्छंदी मुक्त भरारी घेणारा समुद्रपक्षी.. सारं काही न्याहाळत मी मऊ मऊ वाळूच्या सानिध्यात सोनेरी स्वप्नांचे असंख्य मनोरे उभारत एका विलक्षण मनःशांतीचा अनुभव घेत होते.
     इतक्यात अचानक समुद्रात एक वादळ उठले. संपूर्ण समुद्रच ढवळून काढणारे तुफान... पण या समुद्राने त्या वादळाला अलगद एका थैलीत भरले आणि ती थैली हळूच माझ्या मनात रीती केली.. तेव्हापासून समुद्र माझ्यापासून खूप दूर गेला... खूप खूप दूर...

✍️निकिता विचारे