सतत वाटायचं
कुणी तरी हवं असं
दूर राहून ही माझं अस्तित्व
व्यापून राहणारं...
तू आलास
आणि
भरून गेल्या
साऱ्या उणिवा...
पण,
आपण एकमेकांचे नाही
या जाणीवाच
जीवघेण्या..
तसं पाहिलं तर
या आधीही आपण
नव्हतोच कधी
एकटे..
होतेच की आपल्यासोबत
आपले
'रंगहीन सोबती'...
खरं तर आपणही
स्वीकारलं होत त्यांच असं
रंगहीन होऊन
आपल्याकडे येणं,
त्यांची सोबत असूनही
आपलं एकाकी जीणं..
मग आताच का हे असं व्हावं?
त्यांच्या रंगहीनतेवर आपणच
का उभारावीत
प्रश्नचिन्हं ?
का लागली रंगांची आपल्याला अशी अचानक ओढ?
अरे, श्वास भरून आलाय
मिठी थोडी सैल सोड ...
हल्ली तूच असतोस रे सगळीकडे
जिकडे तिकडे तुझंच मार्दव लेवून..
मनात उठलेली लवलव आणि
रसरसलेलं नवं जीवन घेऊन..
रंगून जावं म्हणतेय
तुझ्याच रंगात नखशिखांत ..
तुझ्या मिठीत रीत व्हावं
करावं हे मन शांत ..
नको वाटतेय समाजाशी बांधिलकी,
आणि पर्वाही नाही
चारित्र्याची ..
कळतेय ती फक्त संयम टाळून
गात्रागात्रात सळसळणारी
रक्तपालवी...
-निकिता सु. विचारे