Friday, November 4, 2022

एकतर्फी प्रेम..!

धावत राहिली मृगजळामागे प्रेम दूतर्फी आहे या आशेने,

तो मात्र भरकटत गेला एका वेगळयाच दिशेने..

भरभरून दिलं तीने पण झोळी याची फाटकी ठरली

याच्या हातावरची तिची रेष हळूहळू सरली..

कळलं होतं तिला मीरा का कृष्णावर भाळली,

दारी त्याच्या गुलाब लावून हिने केसात अबोली माळली..

गालांवरच्या मोत्यांना आतल्या आत गिळत गेली,

भळभळणाऱ्या जखमेवर आपली आपण फुंकर घातली..

आयुष्याच्या परीक्षेत तीने असेच भागले स्वतःला

बाकी शून्य उरताच हरवून बसली जगाला.. 

✍️निकीता सु. विचारे


Saturday, October 29, 2022

भेट

आज तो तिला अचानक रस्त्यात भेटला
तिला पाहून जरा तोही थबकला,
मंगळसूत्राच्या वाटीला तिने पटकन मुठीत धरलं
जसा जीव मुठीत धरावा
काय भरवसा उगी हृदयाचा ठोका चुकवा..
नजरानजर झाली, मनाची घालमेलही कळली
जावं का नाही या विचारानं ती थोडी घुटमळली.. 
मग पाऊल उचलायचं टाळलंच त्याने,
नवल वाटलं तिला आजही किती अचूक हेरलं याने..
न सांगता सारं काही याला कसं बरं उमगतं
नुसतं नजरेत पाहून सारं कसं समजतं ?
जादूगार आहेस खरा 
मग का बदलता आली नाही नियती,
कर्तव्याच्या नावखाली का जाऊ दिलंस मला सती.?
डोळ्यातील आसवं लपवत त्याने वाट बदलली
एक अधुरी कहाणी पुन्हा अधुरीच राहिली.. 

✍️निकी

Saturday, July 9, 2022

आठवण..

मनाच्या बंदीस्त कोपऱ्यातून एक आठवण हळूच डोकावते,
एक आठवण 
रुपेरी वाळूत सोनेरी पावलं उमटवत बागडणारी..
एक आठवण भरतीची, 
तुझ्या पहिल्या स्पर्शाची, चिंब भिजवून टाकणारी.. 
एक आठवण 
तुझ्या दूर जाण्याची, 
काळीज पिळवटणारी.. 
आत आत खेचणाऱ्या आहोटीची..  
शेवटी या सरकणाऱ्या वाळूवर  पाय घट्ट रोवून उभं राहावं लागतं,
आठवणींना तुझ्या पुन्हा एकदा बंदिस्त करावं लागतं..  
✍️निकी

Tuesday, July 5, 2022

सत्य

माझ्या आतल्या आत चालत राहत एक अंतरद्वंद्व
ज्यात पत्करावीच  लागते मला शेवटी हार,
फक्त तुझ्या विजयासाठी...
तू जिंकतोस त्यात, खरं तर जिंकल्याच्या भ्रमात राहतोस,
ओळखता येत नाही तुला त्यामागचं सत्य,
तुला वाटतं झालं, विरलं .. आता कशास धरावं अगत्य..
पण तुला हे कधीच उमजत नाही,
की क्षणिक गोष्टी विरतात, 
या अशा मात्र आतल्या आत जिरतात..

✍️निकी 

Wednesday, April 27, 2022

भडभडून नाही बोललास तरी चालेल ;
फक्त चारच शब्द मधात घोळवून  बोल
मनाचं दार तुझ्या तू हळूहळू खोल.. 
पाहू दे मला आत येऊन असं काय घडलंय,
तुझ्यातलं लहान मुलं कुठे जाऊन दडलंय.. 
आणेन  त्याला अलगद तळ हातावरून बाहेर
आजन्म जपेन, देईन प्रेमाचा आहेर.. 
तू फक्त परवानगी दे  स्पंदनात उतरायची
हृद्यातलं दुःख रीते करत  सुखाने ओंजळ भरायची.. 
✍️निकी

Monday, April 25, 2022

जेव्हा पहिल्यांदा त्यांनी तिच्या पायात पैंजण बांधले,
छुमछुम तालात बंधन घरभर नाचले.
मग एक एक अलंकार पुढे चढतच गेला,
फुलू पाहणाऱ्या स्वप्नांना हळूहळू गाढतच गेला.. 
तशातच एक सावित्री आली अंधारातून पुढे,
हाती लेखणी देत ती बेड्यांना तोडे..
मुक्त झाली कळी कर्तृत्व जगभर गाजे
पैंजणातून तेव्हा तिच्या चैतन्य वाजे.. 
✍️निकी