Thursday, June 13, 2019

अवकाश - सानिया

पुस्तकाचे नाव: अवकाश

लेखिका: सानिया

साहित्य प्रकार: कादंबरी
प्रकाशन: मौज प्रकाशन गृह
पृष्ठसंख्या: १५३
किंमत: १२५


     आशयघन आणि प्रयोगशील लेखन करणाऱ्या सानिया यांची अवकाश ही कादंबरी २००१ मध्ये प्रकाशित झाली. कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत असताना अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून ती माझ्या वाचनात आली व मनाच्या एका कोपऱ्यात आपला एका ठसा उमटवून गेली.

     सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली चिंतनशील व आत्मभान आलेली जान्हवी आपल्याला या कादंबरीत भेटते. तिच्या आयुष्याचा प्रवास इथे चित्रित करण्यात आला आहे. सुंदर, बुद्धिमान,कलासक्त व आत्मभान आलेली जान्हवी मुंबईत सायनच्या एका चौकोनी कुटुंबात (आई,वडील,भाऊ) वाढली. पारंपरिक मद्रासी कुटुंबातील संस्कारांच्या प्रभावात जगणाऱ्या आईला सुंदर मुलगी कायमच एक ओझे वाटली. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणारी ही प्रतिभावंत कन्या आपल्या कुटुंबात मात्र कायम आईच्या दुय्यम वागणुकीची शिकार ठरली आहे.

     मुंबईत नोकरी निमित्ताने राहणारी कुटुंब आणि त्यांचे सुखदुःख याचे चित्रण प्रस्तुत कादंबरीत अनुभवायला मिळते. घरातील मोठ्या मुलाच्या अपघाती मृत्यूचा जान्हवीच्या कुटुंबावर प्रचंड मानसिक आघात होतो. त्यातून सावरू न शकलेले तिचे कुटुंब मद्रासला परत येते व नातेवाईकांकडे आश्रित म्हणून राहताना त्यांच्या उपकाराच्या ओझ्याने दबून जाते. कलासक्त व कुशाग्र जान्हवीचा विवाह या कौटुंबिक आघातामुळे तिच्यापेक्षा सामान्य कुवतीच्या राघवनशी होतो. राघवन हा पत्नीच्या सौंदर्याची, सामर्थ्याची आतून जाणीव असलेला पण एक प्रकारची भीती बाळगणारा व त्यामुळेच नवऱ्याची सत्ता वापरणारा अहंकारी पुरुष आहे. त्याच्यासोबत शरीरमनाने एकरूप होत स्वतःचा विकास साधण्याची जान्हवीची इच्छा असते. मात्र तो तिला तशी एकही संधी देऊ पाहत नाही. यानंतर सुन्न झालेली जान्हवी नाईलाजाने का होईना पण लग्नानंतरच्या आयुष्याचा स्वीकार करतेच. राघवनशी आपला संवाद होऊ शकत नाही हे तिच्या लक्षात येते. " एक पुरुष म्हणून आपल्यासारखं बाईचं सामर्थ्य त्याला नक्की जाणवत आहे. नकळत का होईना पण त्या सामर्थ्याची त्याला भीती वाटते आहे. त्याच्या नवरा या नात्यात सामावलेल्या साऱ्या अधिकाराचा तो पुरेपूर वापर करणारच. कायम आपण तो तसाच साठवून घेत राहायचा ? किती काळ ? " या प्रश्नाने अस्वस्थ होणारी जान्हवी आपली आई, मैत्रीण गायत्री यांचे संसार डोळसपणे पाहत चिंतन करत राहते व कर्तव्यबुद्धीने आपल्या नीरस संसारात पतीची सहचारिणी बनते. शेवटपर्यंत त्याला जपते त्याच्या मुलांचे संगोपन करण्यात गुंतून जाते. मात्र पुढे आपल्याला एक संवेदनशील मन होतं ते आपण गाडून टाकलं की आपोआपच उध्वस्त झालं ते ? असा तिला प्रश्न पडतो. मग ती आतून स्वतःचेच असे एक विश्व निर्माण करते. त्यात तिचे काव्यलेखन चालूच राहते. 

     या संपूर्ण पार्श्वभूमीवर श्रीनिवासच्या मृत्युला कारण ठरलेला मुंबईत शेजारी राहणारा व तिच्या भावविश्वाशी अत्यंत जवळ असलेला, कुटुंबाच्या दृष्टीने वाया गेलेला तिच्या भावाचा मित्र अनिकेत तिला वीसेक वर्षानी अचानक भेटतो व त्याला ती आपले शरीर बहाल करते. कादंबरीतील ही एक मनाला न पटणारी घटना वाटत असली तरी हा प्रसंग अर्थपूर्ण आहे. याला खोल मानसशास्त्रीय अर्थ आहे. ही गोष्ट ती ननैतिक पध्दतीने स्वीकारते. मात्र तिच्यावर प्रेम करणारा व कुटुंबाच्या अत्यंत निकट असणारा गायत्रीचा पती सदाशिवन याच्याविषयी तिच्या मनात जिव्हाळा असला तरी त्याच्याशी ती शरीर संबंध येऊ देत नाही. प्राप्त परिस्थितीत आपले शिक्षण, आपली स्वप्नं, उन्नतीचे अर्थपूर्ण सहजीवन सारे बाजूला ठेवून राघवनचा संसार करणारी जान्हवी मानसिक प्रेम व शारीरिक आकर्षण यांचे भान प्रगल्भतेने हाताळताना दिसते.

     परिस्थितीला शरण जात कोणतीही बंडखोरी न करता आयुष्याशी संघर्ष करणारी जान्हवी हवे ते मिळवण्याचा प्रयत्न करते आणि मिळवण्यात यशस्वी होते. आत्मभान आलेल्या व कौटुंबिक चौकटीत राहून अखेरपर्यंत जपणाऱ्या जान्हवीचे हे भावविश्व या काळातील स्त्रीवादी प्रवाहातील लक्षणीय स्त्रीचित्रण म्हणावे लागेल. मवाळ स्त्रीवादाचा हा हृदय आविष्कार आहे. प्रश्नांना थेटपणे भिडत त्याचे मूळ समजून घेणे आणि त्याची उकल करणे हे सानियांच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य आहे. 


✍️निकिता सु. विचारे