Monday, April 16, 2018

आठवणी

अशीही एक संध्याकाळ...!!!

      आज अख्खी दुपार पेपर तपासण्यात निघून गेली. कामात गुंतवून ठेवणारी एक आळशी दुपार! संध्याकाळचे सहा-सव्वासहा वाजले असतील. म्हटलं उठावं गरमागरम चहा करावा आणि दुपारपासून साठलेला हा सगळा आळस एका झटक्यात दूर करावा. मग चहाची तयारी केली. गवतीचहा, आलं, वेलची सारा साजशृंगार घालून चहा तयार केला. त्या गरम चहाचा मग घेऊन बाल्कनीत येऊन बसले.
       समोर मावळीतीला जाणारा सूर्याचा लालबुंद गोळा! कुणाचा तरी चुकून पाय लागून कुंकवाचा करंडा उपडी व्हावा आणि सारं कुंक घरभर पसरावं तसं क्षितीज भासत होतं. पण जीचं कुणाचं कुंकू सांडलं असेल ती किती हळहळली असेल! प्राणपणाने जपलेलं ,आपलं स्वतःच, हक्काचं असं हे हातून निसटलं म्हणून किती व्यथित झाली असेल नाही! म्हणजे अगदी तशीच जशी तू माझा हात सोडून जाताना मी झाले होते ! 
       एक दीर्घ श्वास घेऊन तुझा विचार झटकण्यासाठी मी चहाचा घोट घेतला खरा पण तेव्हा लगेचच जाणवलं की मी उगाचच आलं, वेलची वैगरे उखळवत बसले; चहाला तर स्वाद तुझ्या आठवणींचाच आहे...


✍️ निकिता सु. विचारे