Thursday, October 26, 2017

आठवणी

#आठवणी
तो मला म्हणाला...;
"मला तुझ्याइतकी सुंदर रांगोळी नाही ग काढता येत..."
पण त्याला कसं सांगावं की तो रंग भरण्यात किती माहीर आहे ते...!
________

#आठवणी
ती - अय्या किती गोड!😍 ये ना माझ्या जवळ ये 😘
तो - खरंच येऊ ?😜😘
ती - मी त्या उडणाऱ्या फुलपाखराला म्हटलं 🦋
तो- मी ही त्याच्याच वतीने बोललो.. तुला काय वाटलं 😉???
ती - 🙈🙈🙈🙈🙈
_________

#आठवणी

हवेची एखादी मंद झुळूक यावी तसा तो तिच्या आयुष्यात आला होता.ती झुळूक कशी आल्हाददायक,हवीहवीशी,प्रसन्न करणारी असते.त्या ओझरत्या स्पर्शाची मग ओढ लागू लागते तशी तिलाही त्याची ओढ लागू लागली.पण केव्हा ती मंद झुळूक वारा होऊन कानात घोंगवेल अन वादळ होऊन उध्वस्त करेल याचा काही नेम नाही तशीच ती सुद्धा अनभिज्ञ होती या वादळा पूर्वीच्या शांतते पासून...

    
              ...✍🏻 निकिता विचारे

Monday, October 9, 2017

ती नसती तर.. ? या प्रश्नातच तिच्या असण्याची सर्व निर्विवाद उत्तर सापडतात अशी ती...

आई....! 


ओठांवरती गाणी डोळ्यांमध्ये पाणी,
मनातलं मनालाच सांगते काही
जग म्हणते तिला आई...

आई हा दोन अक्षरांचा शब्द, सांगून जातो जीवनाचा अर्थ
कारण ती नसेल तर सारं जीवनच आहे व्यर्थ...

ईश्वरास साद घालण्यास आईसारखी दुसरी अन्वर्थक नाही हाक,
त्याच्या प्रेमाची अनुभूती देणारी आईसारखी दुसरी नाही साथ...

मुलांचे सहस्त्र अपराध घालून पोटी त्याला हृदयाशी कवटाळते आई,
त्याच्याच उत्कर्षासाठी चंदनापरी सतत झिजते आई...

आई म्हणजे वात्सल्याची करुण करुण कथा आहे,
आजूबाजूच्या विलासी जगात तिची विरक्तीची प्रथा आहे...

विठ्ठल म्हणजे आई...
भारत म्हणजे आई...
गाय म्हणजे आई...
काम म्हणजे आई...
समस्त संस्कृती ही 
मातेचाच महिमा गाई...

कृष्णाची ती यशोदा आहे शिवबाची ती जिजा आहे,
प्रत्येक बाळाला घडविण्यात त्या माऊलीचीच कृपा आहे...

माता म्हणजे पवित्र अशी गंगा नदी,
माता म्हणजे जन्मानंतरचा पहिला वहिला मंगल विधी...

सर्व जगाचे उदात्तर श्रेष्ठत्तर असे स्वरूप आहे आई,
म्हणून सर्व देवतांच्या आधी नतमस्तक मी तिच्या पायी...
--------निकिता सु विचारे 

Sunday, October 1, 2017

"ती"……

"ती"……
         अनामिक, अवखळ,स्वप्नाळू,स्वच्छंदी आणि स्वैर. रानात बागडणारी हरणी. आपल्याच विश्वात मुक्त वावरणारी. लिहीत असते काही बाही चांदण्याची अक्षर घेऊन आभाळाच्या तुकड्यावर. समुद्र पाहताच प्रचंड हळवी होते. धावत सुटते लाटांवर आपली सोनेरी पावलं उमटवत. कधी बकुळ फुलांसारखी गुंफून घेते स्वतःला मूक होऊन. तेव्हा सुकल्यावरही दरवळत राहते बराच काळ तिची व्यथा. पण त्यातही आनंदच शोधतात लोक. तरीही ती खचत नाही कधी.रुजवून घेते स्वतःला खोल खोल मातीत मुळासारखी फक्त आणि फक्त झाडांना हिरवेपण देण्यासाठी .
         कधी पदराखाली दडवते स्वतःचच दुःख तर कधी चितारते रांगोळीतून तिची पारंपरिक व्यथा .कधी ओठावर रेंगाळत राहते होऊन कविता. कधी आनंदाने फुलपाखरू होऊन बागडत राहते तर कधी लहान मुलांत मूल होवून खेळत राहते. कधी कोरून घेते काळोखावर तिचे गहिरे रितेपण तेव्हा मूक होऊन आक्रंदत राहते तिचे जितेपण. कधी घुसमटत राहते आतल्या आत भंगलेल्या स्वप्नांना कवटाळून. अशा वेळी फेर धरून नाचू लागतात जीवनाचे बेसूर सूर. मग येऊन मिठी मारते मला कसल्याशा अनामिक भीतीने. रडत राहते .थरथरत राहते मला घट्ट बिलगून. वाटते तिला समजवावे, थांबवावे. पण मी रडू देते तिला याच विचाराने की आज मोकळी झाली तरच उभी राहील उद्याचे सारे काही समर्थपणे झेलण्यासाठी... 

आपल्या प्रत्येकीतच असते अशी "ती"……!
          


.........निकिता सु. विचारे