Saturday, July 9, 2016

कविता

स्वप्न....!

स्वप्न पहावित सागरासारखी,

क्षितीजभर पसरलेली

प्रयत्नांच्या वाळूंनी पूर्णपणे व्यापलेली..ll१ll

स्वप्न असावित शिखरासारखी

पूर्णत्वास पोहचलेली,

अन् मनात जपून ठेवावित

सोनेरी स्वप्न भंगलेली..ll२ll

                                    -निकिता विचारे ...

Friday, July 8, 2016

कविता

हे रायचय...!

आजकाल माझी मऊशार शय्या
रोजच टोचते मला अन् म्हणते,
आठवतोय का ग फूटपाथवर झोपलेला
तो चिमुरडा तुला.....ll१ll

पिज्जा बर्गरची पण चव आता
कडू वाटू लागलीय ,
जेव्हापासून ती उपाशी पोर
तुझ्या डोळ्यासमोर नाचू लागलीय .....ll२ll

एकीकडे तू करतेयस
तुझ्या भवितव्याच्या चर्चा ,
तिकडे ती लहानगी गोळा करतायत
रस्त्यावरचा कचरा .....ll३ll

या कचर्यातून त्यांना
बाहेर आणायलाच हवं ,
नुसतं विचार करुन कसं चालेल
त्या दिशेने तुला चालायलाही हवं .....ll४ll

चालता चालता भेटतील 
तुला तुझे सगे सोयरे ,
मदतीला धावून येतील कधी
अनोळखी वाटसरूही सारे.....ll५ll

कुणी देईल दूरवर साथ
तर कुणी अर्ध्यातच फिरवेल पाठ ,
कुणी चांगलंय पुढे जा म्हणेल
तर कशाला नको ते व्याप म्हणून सुद्धा हिणवेल....ll६ll

सगळ्यांनाच हसून "हो" म्हणत
तुला मात्र अथक चालायचं आहे,
हतबल असणाऱ्या त्या नाजूक मुलांना
भटक्या जीवनातून बाहेर काढायचं आहे.....ll७ll

---------निकिता सु. विचारे