लैंगिक शिक्षण - काळाची गरज
अगं आई, हे सेक्स
म्हणजे काय असत गं? चौदा वर्षाच्या पिंकीचा हा प्रश्न ऐकून आई हादरलीच. तुला ग काय
करायच्या आहेत नको त्या चौकश्या, अभ्यासात लक्ष दे त्यापेक्षा.... किंवा बाबा आज क्लासला
जाताना ती मोठी मुलं कसल्यातरी वेगळयाच विषयावर गप्पा मारत होती हो! मला काही कळलेच
नाही. मला म्हणाले, अरे, अजून अंड्यातच आहेत तू. असे काय म्हणत होते हो ते? तुझे ना
नको तिथे कान जास्त असतात. मोठा झालास की कळेल आपोआपच सारे. असे प्रश्न आपल्या आसपासच्या
मुलांना त्यांच्या वयानुसार पडत असतात. पण पालक मात्र त्यांची समाधानकारक उत्तरे न
देता, चक्क त्यांच्या शंका धुडकावून लावतात. परिणामतः त्या मुलांची या विषयाची उत्सुकता
कमी न होता वाढतच जाते. मुले आपआपल्यापरीने त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात.
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेला मराठीतील बालक-पालक
हा सिनेमा हाच विषय केंद्रवर्ती ठेवून निर्माण केला आहे. ह्या चित्रपटामध्ये लैंगिक
शिक्षण हा गंभीर विषय विनोदी पध्दतीने सर्वांना समजेल अशाप्रकारे हाताळलेला आहे. पौगंडावस्थेतील
मुलांना पडणारे प्रश्न, त्यांची पालकांकडून मिळालेली उत्तरे आणि मुलांनी स्वतः शोधलेली
उत्तरे अशी ही कथा आहे. हा चित्रपट मी जेव्हा पाहिला तेव्हा मला प्रकर्षाने जाणवले
की आपल्या देशात लैंगिक शिक्षणाचा मुद्दा तसा वर्षानुवर्ष अनुत्तरीतच राहिला आहे. लैंगिक
शिक्षणावरुन देशात चालू असणार गदारोळ आणि वाढती गुन्हेगारी यांचा विचार करता असंच वाटतं
की लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे.
मुळात लैंगिक शिक्षण म्हणजे काय ? ते मुलांना द्यावे की नाही ? आणि द्यावे तर ते
नेमके कसे ? आणि कोणत्या वयात द्यावे ? याबाबत पालक किंवा शिक्षकच नव्हे तर संपूर्ण
समाजातच संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा असल्यास त्या दृष्टिने
योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे. त्याकरता लैंगिक शिक्षण म्हणजे काय ते जाणून घेणे महत्वाचे
आहे.
लैंगिक शिक्षण म्हणजे निव्वळ शरीरसंबंधाविषयीचे ज्ञान देणे असाच काहीसा समज लोकांमध्ये
आहे. कारण या विषयीची तेव्हढी जागरुकताच आपल्या समाजात नाही. लज्जा आणि संकोच इतक्या
मर्यादित कोशात टाकून घेतलेला आपला हा समजा! म्हणून कित्येक शाळांत या विषयीची पूर्ण
माहिती दिली जात नाही. आणि ज्या शाळा प्रयत्न करतात तिथे पालकांमध्ये गैरसमज असतात.
म्हणून बहुतांशी शाळा पुढाकार घेतांना दिसत नाहीत. पण ही चुकीची बाब आहे. समाजाने या
बाबत सतर्क रहायलाच हवे. लैंगिक शिक्षण म्हणजे सेक्स् विषयाचे शिक्षण असे नसून त्याचे
विविध पैलू आहेत. त्यात मुलींना मासिक पाळी आणि त्यासंबंधित स्वच्छतेचा मुद्दाही अग्रणी
आहे. तसेच एड्स सारख्या महाभंयकर रोगाविषयीही माहिती आहे. वयात येतांना मुला-मुलींची
शारीरिक ठेवण व मानसिक घडण याचाही व अशा कितीतरी गोष्टींचा विचार यांत येतो. या सा-यांची
मुलांना ओळख करुन देणे गरजेचे आहे. आणि या सा-या समस्या मुलांना तारुण्याच्या उंबरठ्यावर
येत असतांना अधिक होतात. हे वय वादळाचे असते. या नव्या बदलामुळे मुलं गांगरुन जातात.
प्रेम व आकर्षण यातील फरक न कळल्याने चुकीच्या वयात व्यक्तीच्या प्रेमात पडतात. इंटरनेट,
प्रसार माध्यमे, व समवयस्कांकडून मिळालेल्या अर्धवट ख-या माहितीपोटी चुकीचं पाऊल उचलतात
आणि बी.पी. सिनेमात म्हटल्यांमुळे शेण खतात, म्हणूनच मुलांना शालेय वयातच लैंगिक शिक्षण
देणे गरजेचे आहे. शाळेत शक्य नसल्यास पालकांनी मुलांना त्याविषयीचे ज्ञान, पुस्तके,
आदि गोष्टी दिल्या पाहिजेत.
आपल्या देशात स्त्रीचे स्थान व दर्जा लक्षात घेता स्त्री संयमाची, संस्काराची मूर्ती
मानली जाते. लज्जा हा स्त्रीचा दागिना मानला जातो. त्यामुळे लैंगिक विषयावरती बोलणे
किंवा ऐकणे स्त्रियांच्या संस्कारांच्या विरुध्द असल्याचा समज आहे. त्यामुळे याविषयीची
चर्चा करण्यास भारतीय मुली सहसा पुढे धजावत नाहीत. परिणामतः त्याविषयीचे त्यांचे अज्ञान
व गैरसमज वाढतच जातात. त्यामुळे मला असं वाटतं कि लैंगिक शिक्षण हे मुलींना अधिक गरजेचं
आहे. मुलींना लैंगिक शिक्षण देत असतांना त्या मासिक पाळीचा भाग येतोच. ब-याच मुलींना
याबद्दलची पुरेशी व योग्य माहिती नसते. याबाबत अनेक अंधश्रध्दा व गैरसमज असतात. उदा.
घराच्या बाहेर पडवीत रहायचे, या दिवसात कशालाही हात लावायचा नाही. देवाचा कोप होतो.
घडीचे कपडे बंद खोलीतच वाळवायचे इ. शहरात याचे प्रमाण अत्यल्प असले तरी ग्रामीण भागात
अजूनही या अनिष्ठ व बिनबुडाच्या परंपरा कित्येक स्त्रिया पाळताना दिसतात. जर याबद्दलची
योग्य माहिती मुलींना लैंगिक शिक्षणातून दिली तर या दिवसांत कसे रहावे, स्वच्छता कशी
ठेवावी याचेही ज्ञान मिळेल व अंधश्रध्देचा पगडा कमी करण्यास मदतही होईल. तसेच मुलींना
लैंगिक शिक्षणाचा फायदा स्व-संरक्षणासाठीही होऊ शकतो. कारण एखादा अति-प्रसंग ओढवल्यास
नेमके काय करायचे हे तरी कळेल. आणि हे जर वेळीच कळले, तर त्या स्वतःचे संरक्षण करु
शकतात.
हे शिक्षण जसे मुलींना आवश्यक आहे तसेच अर्थातच मुलांनांही त्याची गरज आहेच. म्हणून
लैंगिक शिक्षण मुलां-मुलींना एकत्र देणे आवश्यक आहे. मात्र ते योग्य आणि शास्त्रोक्त
पध्दतीने असायला हवे. आपला मुलगा वयात येतोय हे लक्षात आल्यावर त्याचे आई-बाबा काय
करतात? जशी त्याची ताई बावरली होती तसे त्यालाही काही प्रश्न, शंका असतील का? असा विचार
मुलांचे पालक म्हणून आई वडील करतात का? सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे मोठा झाल्यावर
आपसूकच त्याला सारं कळेल असा विचार बहुतेक पालक करतात. या नैसर्गिक गोष्टी आहेत. त्यामुळे
त्या निसर्गावर सोडून देणे सोईचे समजतात. पण बारकाईने विचार केल्यास हे कितपत योग्य
आहे निसर्ग आपल्याला काय करायचे हे जसे शिकवतो तसे काय करु नये हे कुठे सांगतो? त्यामुळे
आपण या बाबतीत पुर्णपणे निसर्गावर अवलंबून राहिलो तर सायबर क्राईम, बलात्कार, स्त्रियांची
अवहेलना यासारखे विकृत गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेच नसते ना? खरं तर मग असे गुन्हे घडायलाच
नकोत. पण दुर्दैवाने आपल्या अवती-भोवती हे नेहमी घडतांना दिसते. याचे कारण लैंगिक शिक्षणाचा
अभाव हेच आहे. मुलांना योग्यायोग्यतेची जाणवी योग्य वयात करुन देणे ही पालक व शाळा
या दोहोंची जबाबदारी आहे. त्यामुळे लैंगिक शिक्षणाबाबतचा विचार या दोन्ही वर्गाने व्यापक
व विवेकाने करावयास हवा.
पाश्चात्य देशात अगदी सहावी पासून शाळेत लैंगिक शिक्षण दिले जाते. उलट आपल्या देशात
अशी परिस्थिती आहे की लैंगिक शिक्षण म्हटलं तर लोकं गप्प रहाणेच पसंत करतात. काही दिवसांपूर्वी
व्हॉट्सॲप वर सेक्स एज्युकेशन या विषयावरचा एक व्हिडीओ आला होता.
त्यात सेक्स एज्युकेशन हा विषय शिकवणारे शिक्षण सेक्स हा शब्द उच्चारणेही टाळत होते.
समोर बसलेल्या विद्यर्थ्यांना संकोचून परंपरेच्या पगड्यात राहून चुकीची माहिती पुरवत
होते. पण त्यातील एका विद्यार्थीनीने उठून शेवटी शिक्षकांचे मत खोडून काढते, व खरी
व योग्य माहिती पुरवण्याचे आवाहन करते. इतक्यात हा विषय सिलॅबस मधून काढून टाकल्याचा
फोन येतो, व शिक्षक सुटकेचा श्वास सोडतात. अतिशय गमतीदारपणे हा विषय मांडला असता तरी
लैंगिक शिक्षणाकडे पाहण्याच्या आपल्या उदासिन वृत्तीचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
जर या शिक्षणाच्या माध्यमातून लहानवयातच मुलांना सहेतुक आणि निर्हेतुक स्पर्शाचे ज्ञान
दिले तर शाळेत सोडणा-या बस किंवा रिक्षाचालकांकडून त्यांचे होणारे शोषण ते थांबवू शकतील.
आपल्यासोबत नेमकं काय होतयं हेच जर त्यांना माहीत नसेल तर ते त्याचा विरोध तरी कसा
करणार? परिणामतः देशात बालयौनशोषणासारख्या विकृत घटना घडतांना दिसतात.
लैंगिक शिक्षणाची गरज नाही असे म्हणणा-या व्यक्तींना मी सांगू इच्छिते कि माध्यमांचा
रेटा, विशेषतः इंटरनेटवर अक्षरशः लाखोंच्या संख्येंने उपलब्ध असणारी पोर्नोग्राफिक
संकेतस्थळे आणि त्यातून उतू जाणारी लैंगिक विकृती यापासून मुलांचा बचाव करायचा असेल
तर त्यांना निकोप कामजीवनाची ओळख शाळेतून करुन दिली पाहिजे. याविषयीच्या अवास्तव व
चुकीच्या कल्पना याने एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. त्यामुळे लैंगिक शिक्षण ही
काळाची गरज असल्याचे मला वाटते.
निकिता विचारे !